कार्तिक जायस्वालचा एका तासात पुशअप मारण्याचा विश्वविक्रम!
कार्तिकच्या रेकॉर्डमुळे फिटनेसच्या क्षेत्रात भारताचा डंका
झूम मराठी न्यूज नेटवर्क
नागपूरच्या कार्तिक जयस्वाल या २१ वर्षीय तरुणाने एका तासात सर्वाधिक पुशअप मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे. कार्तिकने एका तासात ३३३१ पुशअप मारून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. या आधी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर होता. त्याने याच वर्षी या रेकॉर्डला गवसणी घातली होती. मात्र, कार्तिकने एका तासात ३३३१ पुशअप मारून हा रेकॉर्ड मोडीत काढून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याआधीसुद्धा कार्तिकने एका मिनिटात सर्वाधिक टाईल्स फोडण्याचा रेकॉर्ड केला होता.
कार्तिक जयस्वाल एमएमए फायटर भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर फिटनेस प्लेयर आहे. एका तासात सर्वांत जास्त पुशअप मारण्याचा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी कार्तिक गेल्या पाच वर्षांपासून दरदिवशी ६ तासांपेक्षा अधिक वेळ सातत्याने सराव करतो आहे. कार्तिकने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली तेव्हा डॅनियल स्काली हा रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही असे म्हणाला होता. त्यानंतर कार्तिकने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एका तासात ३३३१ पुशअप मारून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे.
एका तासात कार्तिकने तब्बल ३३३१ पुशअप मारून नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने साध्य केलेले हे लक्ष फार कठीण मानले जाते. याकरिता कार्तिक गेल्या दोन वर्षांपासून जिममध्ये विशेष प्रशिक्षण घेतो आहे. याशिवाय सहा तास सराव हादेखील त्याच्या रोजच्या जीवनातील भाग आहे. तो एक तास ध्यानदेखील लावतो. त्यामुळे आज कार्तिकने फिटनेसच्या क्षेत्रात भारताचा डंका वाजवलेला आहे.




