महाराष्ट्र

पीएसआय भरती गैरव्यवहाराचे पुणे कनेक्शन; भाजपाच्या फरार महिला नेत्याला अटक

 कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी भाजपाच्या नेत्या दिव्या हागरगी  यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. बेपत्ता असलेल्या हागरगी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुण्यात अटक केली.

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा गैरव्यवहारामुळे वातावरण तापले आहे. प्रत्येक उमेदवाराकडून लाच म्हणून ६० लाख रुपये घेण्याचा करार झाला होता. या उमेदवारांनी पेपर लिहिण्यासाठी ‘मायक्रो ब्लूटूथ’चा वापर केला, असे ‘सीआयडी’ तपासात लक्षात आले.

या प्रकरणी अडचणीत आल्यानंतर दिव्या हागरगी या फरार झाल्या होत्या. कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक झालेल्या दिव्या या अठराव्या आरोपी आहेत. याआधी त्यांचे पती राजेश हागरगी यांना अटक करण्यात आली होती.

गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या प्रकरणी ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्ष दिव्या हागरगी, शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ, अर्चना आणि शांतीबाई या शिक्षिका आणि कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने या आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. तसेच, आरोपींना एका आठवड्यात तपास यंत्रणेसमोर शरण येण्याचे निर्देशही दिले होते.

अमृत पॉल यांची बदली

राज्य सरकारने पीएसआय भरती गैरव्यवहार प्रकरणी भरती विभागातील वरिष्ठ अधिकारी अमृत पॉल यांची बदली केली आहे. १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमृत पॉल यांची भरती विभागातून अंतर्गत सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदी बदली केली आहे. अमृत पॉल हे पीएसआय भरती गैरप्रकारात सहभागी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे