मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंना अश्रू अनावर…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. संवाद साधत असताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झालेले पाहायलं मिळालं.
झूम मराठी
पुणे(प्रतिनिधी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. पण, पक्षातूनच त्यांच्या भूमिकाला विरोध झाला. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला. पुणे शहर मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पुणे शहराध्यक्षपदी आता नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची निवड करण्यात आली. त्यातच आता वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे. यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मात्र हा संवाद साधत असताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झालेले पाहायलं मिळालं.
अजूनही आपण मनसेमध्येच असल्याचं वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र झालेल्या कारवाईविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हकालपट्टी हा विषय मला खूप लागला आहे. माझी हकालपट्टी होऊ शकत नाही. मी स्वत:हून राजसाहेबांना एक महिन्यात मी पद सोडेन, असे सांगितलं होतं. तरीही माझी हकालपट्टी करण्यात आली, अशी नाराजी वसंत मोरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
माझ्यावर पक्ष कारवाई करेल, अशा विषयासाठी हे मला कधी वाटलं नव्हतं. या पक्षात वयाची 27 वर्ष घातली. हकालपट्टी हा विषय मला खूप लागलाय. वसंत मोरेची हकालपट्टी होऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना तोच शब्द लागलाय, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.



