सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, भाडेकरूने घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही!
या निकालाने भाड्याने राहणार्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.सदर प्रकरणाशी संबंधित एफआयआर रद्द केलं आहे.
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई – भाडे न भरणे हा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. घरमालकाने भाडेकरूविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तो एफआयआर रद्द करून न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालाने भाड्याने राहणार्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात एफआयआर रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्याविरोधात दाखल झालेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले की, भाडेकरूने अडचणींमुळे भाडे भरले नाही तर तो गुन्हा ठरणार नाही. तसेच याप्रकरणी कोणतीही शिक्षा नाही, असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले. हा निकाल नीतू सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांच्या याचिकेशी संबंधित आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तक्रारीत दिलेले तथ्य खरे असले तरी हा गुन्हा नाही असे आमचे मत आहे. भाडे न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, परंतु गुन्हा दाखल केला जाणार नाही. तसेच तशी परिस्थितीही नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित एफआयआर रद्द केलं आहे.




