अनिल देशमुखांना क्लिन चीट देण्याचा राष्ट्रवादीचा अधिकृत निर्णय
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांची अडीच तास बैठक झाली. त्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटलांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली.
भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप राष्ट्रवादीने फार गंभीरतेने घेतला नसून देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने जरी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी फडणवीस यांच्याच काळात त्यांनी अनेक मंत्र्यांना क्लिन चिट दिली होती, अशी आठवण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निमित्ताने करून दिली.
परमीबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आज दिवसभर राजकीय गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांची अडीच तास बैठक झाली. त्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटलांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली. परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांवर ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या निःस्पृह अधिकाऱ्याची किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार इतर अधिकाऱ्यांची चौकशीसाठी समिती नेमण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. परमबीरसिंग यांचे आरोप हे त्यांचे पद काढून घेतल्यानंतरचे आहेत, असाही दावा पाटील यांनी केला.



