‘भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब…’; शिंदे समर्थकांची बॅनरबाजी
झूम मराठी वृत्तसेवा
ठाणे : येत्या ९ फेब्रुवारी रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, ठाण्यातील शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांची माहिती आणि शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. मात्र काही बॅनरवर एकनाथ शिंदेचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. दरम्यान, अजूनतरी यावर कोणतीही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेली नाही. एकनाथ शिंदे हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहे. आपल्या मतदारसंघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एनाथ शिंदे यांचं नावही स्पर्धेत घेतलं जातं होतं. आता चक्क त्यांच्या नावाखाली भावी मुख्यमंत्री असं लिहीत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यानं नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. आता यावर एकनाथ शिंदे कुठली प्रतिकिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यात आणि मानेमध्ये त्रास झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जवळपास दोन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांनी घरूनच राज्याचा कारभार चालवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते फारसे बाहेर पडत नाहीत, त्यामुळे सतत भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही याच मुद्यावरून एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदाचा प्रभार सोपवण्याची मागणी केली होती.


