औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजारपणापासून मुक्त करून त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी बीड ते तिरुपती येथे पायी जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाने रस्त्यातच प्राण गमावले होते. बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे अपूर्ण राहिलेले घराचे स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन केले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे उपस्थित राहून, शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी शिंदे म्हणाले, ‘रुईकर यांचा मृत्यूची बातमी ही सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी होती. या एका कट्टर शिवसैनिकाचा असा करूण अंत झाल्याचे पाहून माझे मन हेलावून गेले होते. मात्र, अशा या अवघड परिस्थितीत या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने मी घेतला. तसेच, बीडमधील शिवसेना कार्यकर्त्यांना निर्देश देऊन हे घर लवकरात लवकर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार आज स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी या घराचे भूमीपूजन होत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे,’ असे शिंदे म्हणाले. सुमंत यांची घर बांधण्याची इच्छा होती. हे त्यांचे स्वप्न होते, ते त्यांच्या संकल्पनेनुसार बांधून पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरेल असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी मंत्री शिंदे यांचे आभार मानले. पती गेल्यानंतर शिवसेना आमच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. मोठा आधार दिला असून, पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी केलेल्या मदतीबद्दल आपण समाधानी आहोत. आज माझे पती हयात नसले तरीही त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विशेष आनंद आम्हा रुईकर कुटुंबियांना आहे. हे घर बांधून पूर्ण झाल्यानंतर गृहप्रवेश करताना एकनाथ शिंदे यांनी आमच्या घराला भेट द्यावी, अशी विनंती कीर्ती रुईकर यांनी शिंदेंना केली. दरम्यान यावेळी रुईकर कुटुंबासह, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्थानिक शिवसैनिक बाजीराव चव्हाण, बीड जिल्ह्यातील समस्त शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा