एसटी संप मोडीत काढण्यासाठी मोठी पावले!; धुळे, जळगावात तणाव
एसटी संप सुरूच असताना आज धुळे आणि जळगाव येथे नवनियुक्त वाहक-चालकांकरवी बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, धुळ्यात दगडफेक झाली तर जळगावात संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे तणावाची स्थिती उद्भवली.
जळगाव: राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. कर्मचारी मागे हटत नसल्याने बससेवा पूर्ववत करण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी एसटीचे स्टेअरिंग हातात घेत गाडी सुरू केली आहे. मात्र, बससेवेला संपातील कर्मचाऱ्यांनी विरोध केल्याने जळगाव बस आगारात गोंधळ होवून तणाव निर्माण झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात धुळ्यासाठी पहिली बस रवाना करण्यात आली. दरम्यान, धुळ्यातही अशाचप्रकारे बससेवा सुरू केली असता चार बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यात एक चालक जखमी झाला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी जवळपास पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे बससेवा थांबलेली आहे. यात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडगा निघत नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे आंदोलन सुरूच आहे. पंधरा दिवसांपासून आजपर्यंत बससेवा बंद होती. मात्र, आज पोलीस बंदोबस्तात प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांच्या साह्याने बससेवा सुरू करण्यात आली. आज तब्बल १५ दिवसांनंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास जळगावहून धुळ्यासाठी पहिली बस (क्र. एमएच २०, बीएल ३९३६) आगारातून बाहेर पडली पण यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला.


