अजित पवारांचा भाजपाला मोठा धक्का; भुसावळचे २१ नगरसेवक राष्ट्रवादीत, खडसेंचे शक्तिप्रदर्शन
जळगाव :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. आधी सत्तेत असलेली महापालिका आणि त्यानंतर जिल्हा बँकेवरील असलेले वर्चस्व भाजपने गमावले आहे. तर आता उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जळगावच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्याच दौऱ्यात भाजपला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का दिला आहे. भुसावळ नगरपालिकेच्या अध्यक्षासह तब्बल २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी घड्याळ बांधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. यासोबतच मुक्ताईनगर येथील दोन पंचायत समित्यांच्या सदस्यांनी आणि सावदा नगरपालिकेतील नगराध्यक्षासह व १४ नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश एकनाथ खडसे यांच्या पुढाकाराने झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उद्घाटन सोहळा आज सकाळी अजित पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक भाजपचे आमदार संजय सावकारे मंचावर उपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मागील काही दिवसांपासून सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच थेट अजित पवारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून मंचावर दिसून आल्याने आमदार सावकारेही राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेला बळ मिळत आहे.



