झूम मराठी टीम जळगाव , 21 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एखाद्या सिनेमाला शोभेल अशी थरारक घटना घडली आहे. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींची जामिनावर सुटका झाल्यामुळे एका टोळक्याने गोळीबार करत चॉपरने हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नशिराबादजवळ ही घटना घडली आहे. भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्याने आज नशिराबादजवळ गोळीबार आणि चॉपर हल्ला केला. या हल्ल्यात एक जण ठार झाला असून एक जखमी झाला आहे.
धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय 20, राहणार पंचशील नगर भुसावळ) हा आपल्या वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी जात होता. सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे. तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मयत धम्म हा आज सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून घरी जात असताना ही घटना घडली आहे. गेल्या 11 महिन्यांपासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता. विशेष म्हणजे. धम्म याचा उद्या 22 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.
गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा