मुंबई । मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून १४ दिवसांचं अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या २०० जागांसाठी आता पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आहे. पुढील महिन्यात मतदान होणार आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल तर भाजप या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नसल्याचं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकांवरून फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय.
ओबीसींसाठीच या जागा आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. ओबीसींना जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचं म्हणत देेवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. माझं आव्हान आहे, सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना राज्य सरकारला अधिकार आहे, या मंत्र्यांनी राज्य सरकारला निवडणुका पुढे घ्यायला भाग पाडा, असंही फडणवीस म्हणाले. या सगळ्यावर राज्य सरकारकडून काय उत्तर येतं हेच पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा