चाळीसगाव ते धुळे मेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा
चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आज सोमवारपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन रेल्वे सेवा, मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यात येत आहेत. महसूल राज्यमंत्री सत्तार म्हणाले, मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा महत्वाकांक्षी सोलापूर- जळगाव रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रेल्वे सेवा व अन्य मार्गांसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.


