काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन सख्ख्या भावांचा मृत्यू..!
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुणतगाव फाट्याजवळ गुरुवारी (दि. १) रात्री साडेनऊच्या सुमारास बुलेट दुचाकीचा अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलेटवरील तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.
मयतांमध्ये माळीचिंचोरा (ता. नेवासा) येथील आदित्य अंबादास अहिरे (वय १६), दीपक अंबादास अहिरे (वय १४) आणि चैतन्य अंबादास अहिरे (वय १२) यांचा समावेश आहे. तिघेही एका बुलेटवरून श्रीरामपूरच्या दिशेने जात असताना पुणतगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोरदार होती की, तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
या प्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, संबंधित वाहनाचा आणि चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.
दरम्यान, तीनही भावांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने माळीचिंचोरा गावासह परिसरात शोककळा पसरली. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

