आपल खान्देश
नगरदेवळा उपसरपंच अपात्रच; जळगाव जिल्हाधिकारी यांचा निकाल कायम
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याची तक्रार दाखल केली असता त्यांना अपात्र घोषित केले होते, विलास पाटील यांनी बचावासाठी केलेले अपील आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा आदेश कायम ठेवला आहे.
नगरदेवळा (प्रतिनिधी):- येथील उपसरपंच विलास राजाराम पाटील(भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रम केले म्हणून नासिक विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांचा निकाल कायम ठेवत अपात्र ठरविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विलास राजाराम पाटील यांनी प्रभाग क्र.2 मधून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्याविरुद्ध दिपक परदेशी यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे ०२/०२/२०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम 1१४ (ज-३) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यात दिलेल्या सर्व पुराव्यांची तपासणी करीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २२/०७/२१ रोजी त्यांना अपात्र घोषित केले होते.
त्या निकाल विरोधात विलास पाटील यांनी नासिक विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील २४/२०२१ दाखल केले होते. त्यावर विभागीय आयुक्त यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करत शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांनी केलेली आपात्रतेची कार्यवाही योग्य व कायदेशीर आहे असा निष्कर्ष काढला. विलास पाटील यांनी बचावासाठी केलेले अपील आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, इतर नऊ अतिक्रमण तक्रारी धारक सदस्यांचे धाबे दणाणले आहे. तक्रारदार तर्फे पाचोरा येथील ऍड. प्रल्हाद बी. पाटील यांनी काम बघितले.



