शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू.. सोलापुरातल्या शेटफळ येथील घटना!
झूम मराठी वृत्तसेवा
सोलापूर- शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता. मोहोळ) येथे सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत नोंद प्रक्रिया सुरू होती.
दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर- माचणुर (ता. मंगळवेढा) येथील निकम कुटुंब हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याचा शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत. तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब आहे. तिन्ही अल्पवयीन मुलं सोमवारी सायंकाळी शेततळ्याच्या बाजूला खेळत होती. पण तोल जाऊन तिन्ही मुलं पाण्यात बुडाली. ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व कुटुंबला लक्षात येण्याअगोदर मुलांचा जीव गेला होता. या घटनेमुळे हिंगमीरे आणि निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तीनही मुलं तोल जाऊन पडली- कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम हे तिन्ही लहान बालके सोमवारी सायंकाळी शेततळ्याच्या शेजारी खेळत होती. पण खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडली. त्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद होत आहे. तिन्ही लहान बालकांचे मृतदेह शवविच्छेदन साठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



