गिरड ता भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सप्ताह उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सदस्य पी सी धनगर, भास्कर पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बोलतांना प्राचार्य एस व्ही शिंदे यांनी पुण्यस्मरण सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश विशद केला. शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब शिवाजीराव पाटील यांनी कर्मवीर तात्यासाहेबांच्या शैक्षणिक योगदानाबद्दलचे महत्व विशद केले. माजी प्राचार्य पी सी धनगर, उपशिक्षक नितिन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सप्ताहाच्या उद्घाटनात रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. यात विविध सामाजिक संदेश देणार्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी काढून लक्ष वेधून घेतले. यात देशभक्ती, कोरोना महामारीत घ्यावयाची काळजी, मुलींवरील वाढते अत्याचार, शिक्षण, आरोग्य, आदी विषयांवर रांगोळी काढलेली होती. शंभर मिटर धावणे, गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, अॉनलाईन व्याख्यान, आदींचे देखील आयोजन सप्ताहात करण्यात आले आहे. कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यतिथीला ( दि ३० सप्टेंबर ) रोजी सप्ताहाची सांगता विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करून होणार आहे.
सूत्रसंचालन सचिन बोरसे व आभार रमेश धनगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक बी पी पवार, पर्यवेक्षक एस एन पाटील, ज्युनियर कॉलेजचे कार्यवाह डी डी भोसले, तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा