सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा, डॉक्टर ख्याती तुसे : जागृत पालक, सुदृढ बालक अभियानाला प्रारंभ
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
मुक्ताराम बागुल नांदगाव तालुका प्रतिनिधी
सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारातून सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळणे शरीराला गरजेचे असते म्हणून आपला आरोग्यासाठी संतुलित आहाराची गरज असल्याचे प्रतिपादन नांदगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ख्याती तुसे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नांदगाव तालुक्यातील ” जागरूक पालक, सुदृढ बालक ” ऑनलाइन अभियानाचा प्रारंभ येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्हि.जे. हायस्कूलमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जगताप, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दीपक वाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जगताप यांनी या अभियानाच्या अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपयोजनाची माहिती दिली. या अभियानांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुला मुलींची आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा पुरविणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे असे उपक्रम या अंतर्गत राबविले जाणार आहे. यावेळी उपस्थितत पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी आरोग्य चांगले असेल तर अभ्यासातही आपण चांगली प्रगती करू शकतो व त्यातून विविध क्षेत्रात विद्यार्थी पुढे प्रगती करू शकतो असे सांगितले. संस्थेचे संकुल प्रमुख ज्येष्ठ पत्रकार संजीव धामणे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेताना आरोग्य विभागाने या अधिनातून एकही विद्यार्थी सुटणार नाही याबाबत सतर्कता बाळगण्याची आवाहन केले. सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक मनोहर बडगुजर यांनी आभार मानले.
आजपासून राबविण्यात येणाऱ्या अभियानात आरोग्य विभागाने वेगवेगळी वैद्यकीय पद्धती स्थापन केली आहेत. या अभियानांतर्गत नांदगाव शहर व ग्रामीण भागातील शाळा अंगणवाडी ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात येईल. यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील 27 हजार 270 बालके तर विविध माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन एकूण 57 हजार 833 विद्यार्थ्यांची तपासणीचे उद्दिष्ट आहे.


