आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाने पाचोरेकर आजारी…


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा (झूम मराठी) गेल्या दहा दिवसापासून अचानक थंडीचा कडाका वाढला. ढगाळ वातावरणासह कमालीचा गारठा जाणवत आहे पारा निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. अचानक बदलणारे तापमान आरोग्यासाठी घातक ठरले आहे. सर्दी, तापाचे रुग्ण अचानक वाढले आहेत. प्रत्येक घराआड तापाचा रुग्ण दिसून येत आहे. सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर झाला आहे.

थंडीने जोर धरल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रात्रभर गारठा आणि दिवसभर थंडी यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक बेजार झाले आहेत. बालकांसह वृद्धांमध्ये आजार आणखीच बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे बघायला मिळत आहे. वाढलेल्या थंडीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने मुलांवर औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. खोकला, सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, थंडीच्या मोसमामध्ये सर्दी आणि खोकल्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. घसा खवखवणे, ताप येणे, कान दुखणे असे दररोज रुग्ण हे रुग्णालयात येत आहेत. लहान मुलांमध्ये थंडीच्या दिवसांत कफाचे प्रमाण वाढते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लहान मुलांना वाफ देण्यासाठी रुग्णालयांमध्ये पालक हे घेऊन जात आहेत. औषध उपचारांनी मुले ही बरी होत आहेत, तसेच लहान मुलांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करावा, असे पाचोऱ्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन राजपूत यांनी झूम मराठीशी बोलतांना सांगितले.


प्रत्येक 10 रुग्णांपैकी पाच रुग्णांना व्हायरल ताप आहे. त्यासोबतच अनेकांना कोरडा खोकला आणि सर्दीच्या तक्रारी आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अपचन आणि उलट्यांचा त्रास होत आहे.

गेल्या काही दिवसापासून वातावरणात चढउतार सुरु आहेत. दर आठवड्यात तापमानात कधी घट तर कधी वाढ होत आहे. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर देखील परिणाम दिसून लागले आहे. मागील आठवड्यापासून हवामानात आणि  हवेत बदल झाल्याने निम्मे पाचोरे शहर आजारी असल्याचं समोर आलं आहे.

वातावरण बदलाचा जास्त परिणाम लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर जास्त प्रमाणात होत आहे. त्यांना सर्दी खोकल्या बरोबरच अपचन आणि उलट्यांच्या तक्रारी डॉक्टरांना आल्या आहेत. लहान मुलांच्या आरोग्यात काही तक्रारी आढळल्यास तातडीने डॉक्टरांना सल्ला घ्या आणि तातडीने उपचार करा, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य जपण्याचा सल्ला दिला आहे.

संसर्ग होऊ नये यासाठी काय कराल? 

  • थंडीमुळे अनेकांना घसा बसण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गरम पाणी प्या. 
  • घराबाहेर पडताना लहान मुलांना उबदार कपडे घाला. 
  • वातावरणातील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे मास्क वापरा.
  • संसर्ग झालेल्या नागरिकांपासून थोडं लांब रहा.
  • लहान मुलांच्या आरोग्यात बदल जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे