एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या पगार वेळेवर होत नसल्यानं आर्थिक अडचणीत असलेल्या एका एसटी चालकानं नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री इथं घडली आहे. कमलेश बेडसे असं या कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. माझ्या आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला जबाबदार धरावं, असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं असल्याच समजतं आहे.
धुळे : साक्री आगारातील कमलेश बेडसे या चालकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनियमित पगारा पोटी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. या एसटी चालकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलीये.
कोरोना काळानंतर अनियमित होणारे पगार आणि ओढवलेला आर्थिक संकट यामुळे बेडसे यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे साक्री आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
आगारात आणि महामार्गावर बसेस आहेत त्या तिथेच सोडून देण्यात आल्या आहेत. मयत बेडसे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेने म्हटलं आहे. आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा