आपल खान्देश
BHR मुख्य आरोपी जिंतेद्र कंडारेला बेड्या; वेषांतर करून लपला होता वसतिगृहात
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं.
राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर येथे अटक करण्यात आले. त्याला आज पुणे विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. इंदूर येथे एका वसतिगृहाच्या इमारतीत कंडारे वेषांतर करून राहत होता. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातील ही मोठी कारवाई मानली जात असून, यामुळे घोटाळ्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी दराने हितचिंतकांना विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल १,२०० कोटींचा हा घोटाळा असून, सध्या हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या घोटाळ्यात मध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून पुणे पोलीस या दोघांचा शोध घेत होते. सुनील झंवर अजूनही फरार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२० रोजी कंडारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच २५ नोव्हेंबरला पोलिसांनी जळगावमध्ये धरपकड केली होती. मात्र, या कारवाईची आधीच माहिती मिळाल्याने जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर हे प्रमुख संशयित आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस कंडारेचा शोध घेत होते. तपासादरम्यान कंडारेची सासुरवाडी इंदूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांचे एक पथक तिथे लक्ष ठेवून होते.




