‘गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा कट एकनाथ खडसेंचा’; तेजस मोरेंचा खुलासा!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांना अडवण्यासाठी चव्हाण यांनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे १२५ तासांचे व्हिडीओ फुटेज फडणवीस यांनी पेन ड्राईव्हद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. यानंतर प्रविण चव्हाण यांनी ते आरोप फेटाळत त्यांचा अशिल तेजस मोरे याच्यावर गंभीर आरोप केला होता. प्रविण चव्हाणयांच्या आरोपांवर बोलताना तेजस मोरे यांनी महाजन हे ड्रग्ज इंडिकेट्स आहेत, हे दाखवण्यासाठी एकाला माफीचा साक्षीदार करण्यात येणार होते. हे सर्व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून आपण करत आहोत, असे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला सांगितले होते, असा खळबळजनक आरोप तेजस मोरे यांनी आज माध्यमांसमोर केला. त्यामुळे चव्हाण यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावमधील तेजस मोरे यांनी हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोरे यांनी आज पुढे येत चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला. ते स्टिंग ऑपरेशन मी केलेले नाही. तसेच, चव्हाण यांना मी कसलेही घड्याळ भेट दिले नव्हते. घड्याळ भेट दिल्याचे चव्हाण यांनी पुरावे द्यावेत. कोणताही पुरावा न देता ते माझ्यावर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत.
तेजस मोरे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या प्रकरणात ४२ जणांचे जबाब घेण्यात आले. त्यातील केवळ १० ते १२ मी नोंदविले आहेत. महाजन ड्रग्ज इंडिके्टस आहेत, हे दाखवण्यासाठी एकाला माफीचा साक्षीदार करण्याचे ठरवण्यात आले. त्या गुन्ह्यावरून महाजनांवर मोका लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता. त्याबाबतचे चॅटिंगचे सर्व पुरावे माझ्याकडे आजही आहेत. जळगावात पुणे पोलिसांनी ९ जानेवारी रोजी छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांच्या जेवणाचे बिल मी ‘गुगल पे’ वरून दिले होते. छापा पडल्यानंतर माझा एक माणूस पंच म्हणून दिला होता, तो खोटा होता. छाप्यावेळी महाजनांशी संबंधित असलेले भोईटे यांच्या घरात खोटे पुरावे ठेवण्यात आले होते.
सरकारी वकिल प्रवीण चव्हाण तेव्हा सांगायचे की, एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व कट कारस्थान आपण रचत आहोत. गिरीश महाजन यांना मोक्का लावून अटक करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखही त्याबाबत सांगायचे, असे सांगून मोरे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या प्रकरणातील फिर्यादी आणि प्रवीण चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून माझा त्यावेळी वापर केला गेला. सरकारी वकिल आणि फिर्यादी हे एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे फिर्यादीला काही जबाब द्यायचे असतील, तर ते मला पाठवयाचे आणि ते मी चव्हाणांकडे द्यायचो. तसेच, चव्हाण यांचे काही संदेशही मी फिर्यादीला द्यायचो, असेही त्यांनी सांगितले.
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना मी कोणतेही घड्याळ भेट दिलेले नाही. त्यामुळे स्टिंग ऑपरेशसंदर्भात ते माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. ज्यावेळी माजी आमदार अनिल गोटे हे चव्हाणांना भेटायला आले हेाते, त्यावेळी मी त्या ठिकाणी होतो. पण, केबिनमध्ये त्यांची चर्चा सुरू होती. मला फक्त मंगेश चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची फाईल्स आणून देण्यास सांगण्यात आले होते,अशी माहितीही मोरे यांनी दिली.



