सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण; नितीन पाटील यांच्याकडून विशेष विद्यार्थ्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप..
वनकोठा येथील सहवास मतिमंद निवासी शाळेतील ३५ ते ४० विशेष विद्यार्थ्यांना अत्यावश्यक वस्तू, फळे व अल्पोपहाराचे वाटप; समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश.

- संभाजी पाटिल (भडगाव प्रतिनिधी)
भडगाव (प्रतिनिधी) समाजाप्रती असलेली जबाबदारी केवळ शब्दांत न मांडता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणाऱ्या भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील युवक नितीन पाटील यांनी वनकोठा येथील सहवास मतिमंद निवासी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक वस्तू, फळे व अल्पोपहाराचे वाटप करत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला.
पुणे येथील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले नितीन पाटील हे व्यावसायिक आयुष्यात यशस्वी असतानाच समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्याच सामाजिक जाणिवेतून शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी वनकोठा येथील सहवास मतिमंद निवासी शाळेला भेट देत तेथील ३५ ते ४० विशेष विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तू, ताजी फळे तसेच अल्पोपहाराचे वाटप केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. सामाजिक कार्य हे केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून प्रेम, आपुलकी आणि सहवास यांचीदेखील या विद्यार्थ्यांना तितकीच गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात समाधान पाटील, रवींद्र पाटील यांचीही उपस्थिती होती. संस्थेचे शिक्षक सावंत यांनी नितीन पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. समाजातील सुशिक्षित, यशस्वी व प्रतिष्ठित नागरिकांनी अशा संस्थांना नियमित भेटी देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, त्यांच्या गरजा समजून घ्याव्यात आणि शक्य त्या स्वरूपात मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी समाजाचा सहभाग अत्यंत आवश्यक असून, अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक बळ मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अशा संस्थेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत काही क्षण व्यतीत करावेत, असे आवाहन नितीन पाटील यांनी केले.

