नागरिकांच्या सोईसाठी पाचोरा नगरपरिषदेचा स्मार्ट AI स्मार्ट व्हाट्सअप चॅट बॉट

पाचोरा शहरातील नागरिकांना सेवा सुविधांची माहिती व तक्रार निवारणाची सुविधा आता घरबसल्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहे. पाचोरा पालिकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित व्हॉट्सअप चॅटबॉटची निर्मिती केली असून, या अत्याधुनिक सुविधेचे लोकार्पण नगराध्यक्षा सुनीता पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पालिकेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमीत पाटील, भाजपचे गटनेते सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रहमान तडवी, बांधकाम सभापती प्रियंका पाटील, सभापती मीनाक्षी एरंडे, तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची आवश्यकता कमी होईल. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुकर प्रशासनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाने १५० दिवसांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारः संकेतस्थळ जीवनमान, तक्रार निवारण व्यवस्था, ई-ऑफिसचा वापर, अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनात पाचोरा नगर परिषदेने हा एआय प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- असा आहे एआय चॅटबॉट.
पाचोरा नगर परिषदेने नागरिकांसाठी ऑटोमेशन व एआयवर आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या चॅटबॉटद्वारे पालिकेच्या सेवा-सुविधांची माहिती तत्काळ मिळेल, विविध योजनांची माहिती उपलब्ध होईल, नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतील, तर समस्यांचे जलद निवारण शक्य होणार आहे.
- अशी मिळवा माहिती.
नागरिकांना १८००२३३५२५९ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप मेसेज करून आवश्यक माहिती मिळवता येईल. तसेच शहरातील समस्यांबाबत तक्रार नोंदवता येईल. सर्व नागरिकांनी या एआय चॅटबॉटचा लाभघ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी केले आहे.




