तरवाडे येथील नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता..!

चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक (Tarwade Bk Chalisgaon) या गावात धक्कादायक घटना घडली आहे. एक नऊ वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. धनश्री शिंदे असं बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव आहे. धनश्रीचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आलं. या घटनेला आता तीन दिवस उलटून गेली तरीही तिचा शोध लागला नाही.
धनश्री ही तरवाडे बुद्रुक गावातील शाळेत शिकत होती. 12 डिसेंबरला शाळा सुटल्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून तिचा तीन दिवसांपासून तिचा शोध लागला नाही. त्यामुळे धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
धनश्रीच्या वडिलांनी याबाबत समाज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “धनश्री सकाळी 10 वाजता शाळेत गेली. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली. त्यावेळी दोन मुलं घरी आली पण ती आली नाही म्हणून तिचा शोध घ्यायला शाळेकडे गेलो. तिकडे सापडली नाही म्हणून पूर्ण गाव शोधलं, पण ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर दोघा-तिघांना सागून शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही शोध केला पण तिचा पत्ता लागत नाही.”
गेल्या तीन दिवसांपासून धनश्री बेपत्ता असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावात ठाण मांडून आहेत. एलसीबी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांची विचारपूस केली आहे. पोलीस प्रशासनाकडून चिमुकलीचा कसून घेण्यात येत आहे.



