Pachora Today | फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांनां परीक्षेला बसू दिले नाही,
शिक्षणाचा अधिकार हिरावला जाणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ठाम भूमिका..
- Pachora Today @ दिलीप परदेशी
पाचोरा शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षण घेणारे दोन सख्या भावंडानां फी थकबाकी असल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू दिलं नाही, अशी धक्कादायक घटने विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे तक्रार करून कारवाई करावी अशी मागणी केली.
शारदा इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत शिकणाऱ्या उबेद फिरोज खाटीक (वर्ग ४, वय १० वर्षे) आणि हमजा फिरोज खाटीक (वर्ग २, वय ८ वर्षे) या विद्यार्थ्यांना फी थकबाकी असल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू देण्यात आले नाही अशी तक्रार मनसे कार्यकर्ते यांना करण्यात आली, मग मनसेने या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी पाचोरा तालुका यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली असून संबंधित शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीची आईची तब्येत गंभीर असून त्याची किडनी निकामी असल्यामुळे त्या त्रस्त आहेत. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा वेळी शाळेने विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क हिरावून घेतला, ही गोष्ट निंदनीय आहे असे सांगीतले.
शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक भारतीय मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. फी थकबाकीच्या कारणावरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे संविधानाच्या कलम 21(A) आणि शिक्षणाचा अधिकार कायद्याचे उल्लंघन आहे. समाजातील गरीब व आजारग्रस्त कुटुंबांप्रती शाळांनी संवेदनशीलता दाखवावी हीच आमची अपेक्षा असून, विद्यार्थी सेनेने यापुढेही अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
मनविसे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा दुंदुले, मनसे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, मनविसे शहराध्यक्ष निलेश मराठे, शहर सचिव वाल्मीक जगताप व मनसैनिक उपस्थित होते.



