उद्या पाचोऱ्यात सर्वसामान्य नागरिकांची ‘पाचोरा बंद’ची हाक…
पाचोरा (झूम) महाराष्ट्रात सद्यस्थितीत महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा वारंवार प्रयत्न RRS प्रणित भाजपातर्फे सुरु आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून पाचोरा शहर १४ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
यासंदर्भात शहरातील हुतात्मा स्मारकातील ठिकाणी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापुरुष सन्मान समिती गठीत करण्यात आली. सदर बैठकीस पाचोरा शहरातील सर्व पुरोगामी चळवळीच्या संघटना, कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वानुमते समितीच्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.

पाचोरा शहरातील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी या समितीमध्ये सहभाग नोंदविला असुन १४ डिसेंबर बुधवारी पाचोरा शहरातील पाचोरा अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाला व्यावसायिक, किराणा दुकाने, कापड दुकाने, मोबाईल दुकाने, सलुन, हार्डवेअर दुकाने यासह अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन महापुरुष सन्मान समिती वा सर्व सामाजिक संघटनांतर्फे शहरवासीयांना आवाहन करण्यात आले.




