मुंबई : महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.
राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आर्थिक भाराचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.
जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न
सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.
उत्तम नियोजन करावे
18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे
या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा