महाराष्ट्रराजकीय
आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला १ कोटींची नोटीस, बनावट क्लिप तयार केल्याचा आरोप
कोव्हिड केअर सेंटरमध्ये विविध उपक्रम राबवणारे अहमदनगरमधील पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आता पुन्हा चर्चेत आलेत. सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्याविरोधात लंकेंनी थेट एक कोटींची नुकसान भरपाईची नोटीस पाठवलीय. मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, फोनवर बोलताना लंकेंनी आक्षेपार्ह भाषा वापरली. या संभाषणाची ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये लंकेंच्या कोव्हिड सेंटरवर अविनाश पवारांनी आरोप केले होते. शिवाय, लंकेंपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही म्हटलं होतं. आता निलेश लंकेंनी वकिलामार्फत अविनाश पवार यांच्याविरोधात नुकसान भरपाई म्हणून एक कोटी द्यावे आणि जाहीर माफी मागावी, अशी नोटीस पाठवलीय. सोशल मीडियावर व्हीडिओ प्रसारित करून आपली बदनामी झाल्याचा दावा आ. निलेश लंकेंनी केलाय.




