“तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?”, रोहिणी खडसेंनी भाजप आमदाराला सुनावले
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
जळगाव | सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. राजकीय वातावरणही यामुळे तापलं आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यातबंदी केली असती तर रेमडेसिविरचा तुटवडा भासला नसता. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांची धावपळ होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही खडसे यांच्या या विधानावर पलटवार केला होता. यावरून नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे आक्रमक झाल्या असून त्यांनी संतप्त होत राम सातपुते यांनी सुनावले आहे.
काय म्हणाले होते राम सातपुते?
नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केला. तसेच निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल, असं राम सातपुते यांनी म्हटलं होतं.
रोहिणी खडसेचे प्रतिउत्तर
एकनाथ खडसे जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?, तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर सिद्ध करा ना? शामराव फडणवीसी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.



