जळगाव, धुळ्यात आघाडीच्या लोकसभा उमेदवाराचा पेच कायम…?
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने खान्देशातील चारही मतदारसंघाच्या जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलीत. भाजप उमेदवारांची घोषणा होवून १४ दिवस उलटले आहेत. खान्देशात धुळे, जळगाव, रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. उमेदवार निश्चित होत नसतांनाच दररोज नवनवीन नावांची चर्चा होत असल्याने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर सभ्रमात पडले आहे.
जळगाव लोकसभेची जागा असलेल्या ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपातील एका प्रमुख पदाधिकाऱ्याला फोडण्याचा डाव असल्याने उमेदवार ऐनवेळी जाहीर भाजपाची नाकेबंदी करण्याचा डाव खेळला जात आहे. दरम्यान, भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावाची देखील ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील इच्छुक डॉ. हर्षल माने, कूलभूषण पाटील व अँड ललिता पाटील यांची नावे मागे पडली आहेत.
धुळ्यातही उमेदवारीचा पेच कायम..
भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात तुल्यबळ असलेल्या उमेदवाराचा शोध काँग्रेकडून घेतला जात आहे. आमदार कुणाल पाटील यांनी उमेदवारीसाठी नकार दिल्याने आता काँग्रेसकडून तुषार शेवाळे, प्रशांत हिरे, धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. त्यात आणखी काही नविन नावांची भर पडत असल्याने तेथेही आघाडीचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत.



