‘तो’ फक्त खातो पोलिसांच्या हातची भाकरी!
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
औरंगाबाद : एरव्ही रहदारीने गजबजणाऱ्या आणि आता कोरोनामुळे रहदारी कमी झालेल्या सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते सिडको एन-वन येथील भक्ती गणेश मंदिरदरम्यानच्या रस्त्यावर एका बेघर व्यक्तीचा वावर असतो. कोणाला दया आली तर त्याला खायला देण्यासाठी पुढे येतात, पण तो ते घेत नाही! त्याची नजर भिरभिर शोधत असते एका वाहतूक पोलिसाला. वाहतूक पोलिस दिसताच त्यांच्याकडे जाऊन त्यांचा डबा घेऊन तो आनंदाने जेवण करतो. गेल्या तीन महिन्यांपासून हा नित्यक्रम अविरत सुरू आहे. यामुळे वाहतूक पोलिसही गेल्या तीन महिन्यांपासून स्वत:च्या डब्ब्याबरोबरच आवर्जून त्या बेघरासाठी डब्बा घेऊन येतात. यामुळे पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन या उपक्रमातून घडत आहेत.
रोज एक ते दीडच्या सुमारास हा बेघर व्यक्ती गोरखनाथ यांचा सर्वत्र शोध घेतो. विशेष म्हणजे जेवण झाल्यानंतर डब्यातील एक कणही वाया जाणार नाही याची काळजी घेत डब्बा विसळून ते पाणी पितो! शुक्रवारी (ता.२३) तो गोरखनाथ गोल्हार यांचा शोध घेत आला. सिडको बसस्थानकाच्या पुढे कर्तव्यावर हजर असलेल्या गोल्हार व त्यांचे सहकारी मदन लक्ष्मण गोरे यांनी त्यास डब्बा दिला. त्यांनी जेवण करून त्यात उरलेली चपाती बाजूला ठेवली. डब्बा विसळून पाणी प्यायला. दोन्ही पोलिसांना नमस्कार करीत अनवानी पायांनी सिडकोतील चौकाकडे निघून गेला



