उद्या काकणबर्डीच्या खंडोबाची यात्रा, भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविक यात्रेत होणार सहभागी..
पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी ( Kakan Bardi ) चंपाषष्टीला खंडोबा यात्रोत्सव साजरा होणार असून पंचक्रोशीतिल भाविक, ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित राहून भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत असतात.
पाचोरा शहरापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर व गिरड रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या टेकडीवर पौराणिक कथेचा आधार असलेल्या व महादेवाच्या अनेक अवतारांपैकी खंडोबाचे मंदिर आहे. अख्यायिकेनुसार याच टेकडीवर खंडोबाने केलेल्या दुसऱ्या विवाहा हाताचे काकण सोडल्याने या टेकडीला काकणबर्डी असे नाव पडल्याची कथा प्रचलित आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्टीला येथे भाविकांकडून मंदिरास रंगरंगोटी, रोषणाई, झेंडूची फुले, जय मल्हारच्या गजरात हळद- खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलली जाते.
आरती व सदानंदाचा येळकोट येळकोटचा गजर भाविक घरोघरी करून भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढवला जातो. याच दिवशी काकणबर्डी टेकडीला यात्रेचे स्वरुप येते. या यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा आहे. पूर्वी या टेकडीवर लहान पुरातन मंदिर होते. भाविकांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला व दानशुरांच्या सहयोगातून सभागृह असलेले मंदिर साकारण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व भाविकांसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय केली आहे. यात्रेनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पाणपोई लावण्यात येते. येथे बाजरीची भाकर, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याच्या भरताचा नैवेद्य देण्याची प्रथा असून खंडोबाच्या गजरात तळी उचलली जाते. यात्रेनिमिव टेकडीसह परिसरात खेळणी, पाळणे, हलवाईच्या हॉटेल्स, रसवंती, सरबत, आईस्कीमची दुकाने थाटली जातात. भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील सामाजिक मंडळाकडून केली जाते.
काकणबर्डी देवस्थान परिसरासह राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पौष महिन्यातील चंपाषष्ठीला या यात्रेत राज्यभरातून भाविक येतात. या यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा असून पुर्वी या टेकडीवर लहानसे पुरातन मंदिर होते. भाविकांनी श्रद्धेतून या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतरही दानशूराच्या व भाविकांच्या सहयोगातून मंदिराच्या बांधकामात बदल करून सभागृह असलेले भव्य मंदिर साकारण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास तसेच पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात आली असल्याने यात्रेसह दर रविवारी येथे भाविकांची मोठी उपस्थिती असते.
काकनबर्डी यात्रा



