पाचोऱ्यात मराठा समाज बांधवांवरील अमानुष मारहाणीच्या घटनेचा शिवसेनेने केला निषेध
पाचोरा(वार्ताहर) दि,२ मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे तसेच जालना आंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी पाचोरा येथे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
जालना येथील आंतरवाली सराटी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली असून ती अतिशय दुर्दैवी व संताप जनक आहे.मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर समाजहिताचा विषय आहे सनदशीर मार्गाने चार दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात माता-भगिनींसह तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मात्र शुक्रवारी अचानक पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला ही घटना मानव हिताला न शोभणारी आहे.या घटनेचा पाचोरा व भडगाव तालुक्यातील आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात काम करणारे आम्ही सर्व शिवसैनिक निषेध करत आहोत असे शिवसैनिक प्रसार माध्यमाशी बोलतांना म्हणाले.




