Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना, पाचोरा तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी केले आवाहन
पाचोरा (झूम मराठी) पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत राज्य सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांना (Farmer) पीक विमा ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांमध्ये पिक विमा संदर्भात जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आज पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी पत्रकार परिषदचे आयोजन करून एक रुपयात पीक विमा योजना, तालुक्यातील शेतकऱ्यांना नोंदणीसाठी केले आवाहन.
विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८० ११०) आधारित राबविली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण दिमायाच्या ११० टक्यापर्यंत असणार आहे. या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे.
खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. यात योजनेतील पिके- भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस, कांदा, ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.
- ही कागदपत्रे आवश्यक
शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. यासाठी महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.


