वाहनावर झाड कोसळल्याने जळगाव गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा जागीच मृत्यू..!
आषाढी एकादशीच्या दिवशी घडलेल्या घटनेने पोलीस दलासह जिल्हा सुन्न झाला आहे.
कासोदा ते एरंडोल रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला असून एक अधिकाऱ्यासह कर्मचारी जागीच ठार झाले आहेत. अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे. धावत्या वाहनावर चिंचेचे जीर्ण झाड कोसळून झालेल्या अपघातात जळगाव गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एरंडोल शहरापासून काही अंतरावरील अंजनी धरणाजवळ हा भीषण अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने पोलीस दलात शोककळा पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
पिलखोड जिल्हा बँक शाखेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन व्यवस्थापकच्या सहभागाने सुमारे दिड कोटींचा अपहार करीत वनविभागाची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी गुरुवारी सकाळीच पिलखोड, ता.चाळीसगाव येथे शासकीय वाहनाने (एम. एच. 19 एम. 0751) रवाना झाले होते. दिवसभर केलेल्या चौकशीनंतर तपास पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणानजीक रात्री जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली व त्याचवेळी जीपच्या पुढील भागावर झाड कोसळताच चालक अजय बाजीराव चौधरी(जळगाव) व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत सीताराम शिंदे, भरत नारायण जेठवे व निलेश प्रकाश सूर्यवंशी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमींना एरंडोल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांची धाव
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन- पाटील यांनी धाव घेत माहिती जाणली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



