आपल खान्देशसखी

Pachora शिव महापुराण कथा प्रसंगी भाविकांना तृतीय पंथीयांनी केली शुध्द व थंडगार पाण्याची सोय..

शिवमहापुराण कथाप्रसंगी उपस्थित भाविकांना शुद्ध व थंडगार पाणी पुरविण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे.

पाचोरा येथे 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथा व महारुद्राभिषेक सोहळ्यासाठी समाजातील विविध घटकांच्या वतीने मदत व सहकार्यासाठी हात पुढे सरसावत असून पाचोरा शहर व परिसरातील तृतीय पंथीयांनी शिवमहापुराण कथाप्रसंगी उपस्थित भाविकांना शुद्ध व थंडगार पाणी पुरविण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे. तृतीय पंथीयांच्या या धार्मिक वृत्तीचे व आर्थिक औदार्याचे कौतुक होत आहे.

 

शिव महापुराण कथा व महारुद्राभिषेक सोहळ्यासाठी शहर व तालुक्यातील विविध समाजाचे महिला, पुरुष ,युवक ,युवती, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांशी संपर्क साधून व बैठका घेऊन मदत व सहकार्याचे नियोजन करत आहेत. लाडशाखीय वाणी, माहेश्वरी व अग्रवाल समाज मंडळाच्या महिलांनी तन, मन व धनाने सेवा कार्याचे नियोजन करून आपल्या सेवाभावी कार्याचा प्रारंभ केला आहे. 

कृष्णापुरी भागातील पाताळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रीन एप्पल इव्हेंट व पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांच्यावतीने भडगाव रोड भागातील कैलादेवी मंदिरा मागे असलेल्या सावा यांच्या जागेत 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान शिवमहापुराण कथा व महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भगवान शिवप्रभू नगरी उभारण्यात आली आहे.

 ‘एक लोटा जल, सारी समस्याओंका हल’ या घोषवाक्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय कथा वाचक परम पुज्य पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचे कृपाछत्र प्राप्त शिष्य परम पुज्य पंडित संजयजी शर्मा यांच्या अमृतवाणीतून शिवपुराण कथेचे निरूपण होणार आहे .कथेसोबतच महारुद्राभिषेकाचे हि आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 7.30ते 9.30 दरम्यान महारुद्राभिषेक व सायंकाळी 5.30 ते 9.30 दरम्यान शिवपुराण कथा होणार असून कथा निरूपणानंतर नैनिताल येथील सोनुजी बक्षी व सहकाऱ्यांचा झाकीचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर होणार आहे.

या कथे दरम्यान महारुद्राभिषेक,शोभायात्रेत सहभाग साठी वैयक्तिक व कौटुंबिक तसेच 1 ते 7 दिवसाच्या अभिषेक नोंदणीस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विजय रेडीमेड, सत्यम मेडिकल, अग्रवाल एसटीडी, शरद ट्रेडिंग ,दीपक पान सेंटर, संजय पटवारी ,श्रद्धा मार्बल, उमिया मार्बल, हिमाई टायर्स या ठिकाणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

महारुद्राभिषेकात सहभागी होणाऱ्यांना पंडित संजयजी शर्मा यांच्या हस्ते शिवलिंग, नंदी, नागदेवता, त्रिशूल, जनाधारीपात्र, जलाधारी स्टॅन्ड व दोन रुद्राक्ष भेट देण्यात येणार आहेत. सर्व थरातील व विविध जाती-धर्माचे दानशूर, गोरगरीब, मध्यमवर्गीयांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. आपल्या हातून सेवा कार्य व्हावे म्हणून विविध समाजातील महिलांनी बैठका घेऊन त्यात विविध सेवाभावी कार्याचे नियोजन केले आहे.

या सेवाभावी कार्यासाठीसाठी पाचोरा शहर व परिसरातील तृतीयपंथीय देखील मागे राहिलेले नाहीत. सीमा जान, सायरा जान, मुनमुन जान, शांती सिमा जान, गंगोत्री सीमा जान, रेणुका जान, सोनी जान, दिव्या जान, फातमा जान, ईश्वरी जान आदींनी या सोहळ्याचे आयोजक मोहन अग्रवाल, मून्ना अग्रवाल, संदीप महाजन यांच्याशी स्वतःहून संपर्क साधून आमची काय मदत अपेक्षित आहे? अशी विचारणा केली. तेव्हा आयोजकांनी आपणाला स्वखुशीने जे मदत, सहकार्य व दान करायचे असेल ते करा .असे सांगितल्यानंतर तृतीयपंथीयांनी कथा प्रारंभा पासून ते कथा समाप्ती पर्यंत भाविकांना शुद्ध व थंडगार पाणी पुरवण्याचे जाहीर केले. भगवान शिवप्रभू नगरी या महापुराण कथेच्या मंडपात येऊन तृतीयपंथीयांनी पत्रकार व आयोजकांसमोर ही मदत जाहीर केली व त्या दृष्टिने त्यांनी नियोजन पूर्ण केले आहे.

महिला व पुरुष भाविकांना शिव महापुराण कथेदरम्यान पाणी पिण्यासाठी योग्य अशा ठिकाणी स्टॉल लावून तृतीयपंथीय बांधवांच्या वतीने कथेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना शुध्द व थंडगार पाणी देवुन भाविकांची तृष्णा भागवली जाणार आहे. तृतीय पंथीयांच्या या दानशूर व सेवाभावी वृत्तीचे कौतुक होत आहे.

इतर समाजाच्या महिला, पुरूष,युवक व युवतींच्या वतीनेही सेवाभावी कार्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे