उद्धव ठाकरे शिंदे गटाच्या आमदाराविरोधात मैदानात; २३ एप्रिलला पाचोऱ्यात जाहीर सभा..
माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचे आयेजन केले आहे
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
राजकारणात शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपसोबत (BJP) मिळून सत्ता स्थापन केली. एवढेच नाही तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणही प्राप्त केले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिंदे गटाविरोधात मैदानात उतरले आहेत. शिंदे गटातील प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांविरोधात ते रान उठवताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे गटातील पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Patil) यांच्याविरोधात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार आहे. आ किशोर आप्पा पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणार आहे. ते या सभेत किशोर पाटलांवर तुटून पडणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे.
माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचे आयेजन केले आहे. उद्धव ठाकरेंच्या यापुर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याआधी झालेल्या सभांमधून राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरे किशोर पाटलांना लक्ष्य करणार असल्याचे बोलले जात आहे.
पक्षबांधणीसाठी सभा होत असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली, शिवसेनेतील काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, यात पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचाही समावेश होता. आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची चुलत बहीण म्हणजेच वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाला समर्थन दर्शवले, त्यानंतर पाचोरा तालुक्यात आमदार किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र निर्माण झाले.
उद्धव ठाकरे त्यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याच बरोबर, उद्धव ठाकरे संध्याकाळी साडेपाच वाजता पाचोऱ्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचेही अनावरण करणार आहेत.
असा असेल उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा…
- सकाळी 11 वाजता – जळगाव विमानतळावर आगमन
- विमानतळावरुन खासगी वाहनाने पाचोरा तालुक्याकडे मार्गक्रमण
- सकाळी 12:30 वाजता – पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आगमन
- दुपारी 1 ते 2 दरम्यान – भोजन
- दुपारी 2 ते 3 दरम्यान – विश्रांती
- दुपारी 3 ते 4 ची वेळ – राखीव
- दुपारी 4:30 वाजता – तात्यासाहेब आर.ओ.पाटील प्रयोगशाळेचे उद्घाटन
- संध्याकाळी 5.15 वाजता – शिवसेनेचे माजी आमदार (दिवंगत) आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे उदघाटन
- संध्याकाळी 6.15 वाजता – पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील सावा मैदानावर जाहीर सभा
- रात्री 8 वाजता – जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार



