महाराष्ट्र

राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

झूम मराठी वृत्तसेवा

मुंबई( राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज झाले. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक निमंत्रित उपस्थित होते.

दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उद्घाटन निश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उद्घाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ मध्ये झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती. शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात आला व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे