उद्धव ठाकरेंवरील शिवसैनिकांची निष्ठा जिंकली, गद्दारांचे खोके हरले..
झूम मराठी | डिजिटल
मुंबई – शिवसेनेत पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर महाराष्ट्रासह अवघ्यादेशाचे लक्ष लागून असलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा दसरा मेळावा काल सायंकाळी पार पडला. विशेष म्हणजे शिवसेनेत बंडाचे हत्यार उपसून तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांच्या साथीने एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेसह इतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदे गटाच्या आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे आमचीच खरी शिवसेना (Shivsena) असून सर्व शिवसैनिक आमच्याच बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र काल झालेल्या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याचे स्वरूप बघता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)शिवसैनिकांची निष्ठा जिंकल्याचे दिसून आले. तर शिंदे गटाचे खोके हरल्याचे जाणवले.
शिवसेनेसोबत गद्दारांनी केलेल्या धोक्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांच्या लाखोंच्या गर्दीने विरोधकांना धडकी भरवली. कोणी कितीही दावे केले तरी आमची निष्ठा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहणार असून आमची निष्ठा जिंकली, तर गद्दारांचे खोके हरले, अशी प्रतिक्रिया मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात होती.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला पुणे, जालना, नांदेड, बीड, पालघर आदी जिह्यांमधून अक्षरशः पायी वारी करीत अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचले. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत. दसरा मेळावा ही आमची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही स्वखर्चाने इथे आलो आहोत आणि यापुढेही येत राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिकांनी गद्दारांविरोधात जोरदार घोषणा देऊन त्यांचा समाचार घेतला. ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’, ‘एकनाथ शिंदे गद्दार है’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात येत होत्या. दरम्यान, शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीनेच हादरून गेलेल्या शिंदे गटाने बुधवारी बीकेसीवर गर्दी जमवण्यासाठी आटापिटा केला. भव्य मैदानावर लाखभर लोकांची गर्दी करण्याचे टार्गेट ठेवले, पण प्रत्यक्षात मेळाव्याची वेळ जवळ येताच शिंदे गटाची चांगलीच तंतरली. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर शिंदे गटाने अनेक बसेस उभ्या केल्या, मात्र त्यापैकी मोजक्याच बस भरल्या. त्यामुळे उर्वरित बसेस भरण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागात ‘धरपकड’ मोहीम राबवली. यादरम्यान युपी, बिहार, बंगालच्या कामगारांना फुकटच्या ‘मुंबई दर्शन’चे आमिष दाखवण्यात आल्याचे उघड झाले.



