फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपा-शिंदे गटाला हायकमांडच्या सूचना..
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मात्र सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटाकडूनच एकमेकांचे नेते आणि कार्यकर्ते फोडले जात आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Shinde Group) अंतर्गत वाद पेटला. या अंतर्गत वादाची कुणकुण थेट हायकमांड पर्य पोहचली आहे. एकमेकांचे नेते फोडू नका अशा सूचना भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दिल्या आहेत. यामुळे दोन्ही गटाचे नेते सतर्क झाले आहेत.
शिंदे-फडणवीस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि भाजपने राजकीय हालचालींना सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरती शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. हे पाहता फोडोफाडीचे रुपांतर संघर्षात होऊ नये यासाठी आता थेट भाजप नेतृत्वानेच यात लक्ष घातले आहे.
येत्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक भाजपकडून गळाला लावले जात होते. शिंदे गटाकडूनही याला चोख प्रत्युत्तर म्हणून भाजपचे कार्यकर्ते फोडले जात होते. हे फोडाफोडीचे राजकारण थांबवण्यासाठी भाजपा नेत्यांनी शिंदे गटासोबत अलिखित करार केल्याची माहिती समोर येत आहे.



