शिवसेना नेमकी कोणाची? २७ तारखेच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेनेत उभी फुट निर्माण केली. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली होती. तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आता शिंदे गट BKC मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. तसेच आता खरी शिवसेना कुणाची? यावर २७ तारखेला सुनावणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता सुनावणीकडे लागलेले आहे.
माहितीनुसार, शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली असून राज्यातून दहा हजार बस आणि विदर्भातून तीन रेल्वे गाड्या बुक केल्या आहेत. त्यामुळे BKC वर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; परंतु आता खरी शिवसेना कोणाची? यावर २७ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणी मेळाव्याच्या आधी असल्यामुळे शिवसैनिकांच्या नजरा कोर्टावर लागून राहिल्या आहेत आणि कोर्टाच्या निर्णयावर ठरणार आहे की, खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर की BKC वर होणार ते. तसेच न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. २७ तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरूवातीला फैसला अपेक्षित आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




