पाचोरा तालुक्यातील गावठी दारू विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
पाचोरा तालुक्यातील श्री क्षेत्र नंदिकेश्वर महाराज मंदिर असलेल्या गावात तसेच बिल्दी, हडसन, दुसखेडा, वडगाव, वेरूळी परिसरात सर्रासपणे अवैद्य गावठी दारू विक्री होत आहे. गावागावात सहज गावठी दारू उपलब्ध होत असल्याने तरूणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. प्रशासनाने वेळीच कार्यवाही करून, यावर तत्काळ आणि कडक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गावठी दारू विक्री विरुद्ध गावातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवल्यावर सदर अवैध दारु विक्रेत्यांकडून कुठलीही कारवाई झाली नसून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. सदर अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर मागील काही काळात राज्य उत्पादन शुल्क व पाचोरा पोलिसांच्या वतीने कारवाई देखील करण्यात आली होती. त्या कारवाईला ही न जुमानता अवैध दारू विक्री सर्रास पणे सुरू आहे. मागील काही काळामध्ये या विषारी दारुमुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला असून त्यांचा संसार व परिवार उघड्यावर आला आहे. स्थानिक प्रशासनाने यांचेवर कठोर कारवाई करून अवैध गावठी दारू विक्री कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.




