राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अविनाश घायगुडे..
मुंबई दि : अंबाजोगाई तालुक्यातील केज मतदार संघातील बनसारोळा गावचे सुपुत्र, सर्वसामान्य धनगर कुटुंबातील युवक, व्याख्याते अविनाश घायगुडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व इतर जेष्ठ नेते मंडळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अविनाश घायगुडे यांचा विद्यार्थी दशेपासूनच समाजकारणाकडे, राजकारणाकडे ओढा राहिलेला आहे. याच कारणास्तव अविनाश घायगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २०१९ साली गळती लागलेली असताना पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाने देखील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड केली. राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या या संधीचे सोने करीत अविनाश घायगुडे यांनी अनेक सभा स्वतःच्या वक्तृव शैलीने महाराष्ट्रभर गाजवल्या. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांची आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता आपण येणाऱ्या काळात सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणार आहोत असे घायगुडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.




