राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सारवासारव!
झूम मराठी वृत्त
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला, अशी सारवासारव भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून करण्यात आली आहे.
कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. त्यावर ‘गव्हर्नर आॅफ महाराष्ट्र’ या ट्वीटर अकाऊंटवरून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे.
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असं या स्पष्टीकरणात म्हटलेलं आहे. पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा आरोप कोश्यारी यांनी केलाय.
महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो, असं मतप्रदर्शन करीत, कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये, अशी विनंती केलीय.
किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.



