बदरखे व आखतवाड्यातील शेतकऱ्यांचे बैल जोडी चोरीस, अज्ञात चोरावर गुन्हा दाखल..
झूम मराठी वृत्त
पाचोरा (प्रतिनिधी) नगरदेवळा जवळच आखतवाडे व बदरखे शेत शिवारातून चोरट्यांनी दोन बैल जोड्या चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. परिसरातून एकाच वेळी दोन शेतकऱ्यांच्या बैल जोडया चोरीस गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहॆ तरी प्रशासनाने बैल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सध्या शेतीची मशागत करणे सुरू असून ऐन काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या परिसरात सर्वच शेतकरी पाळीव जनावरे शेतातच ठेवतात. या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकरी सुनिल आधार गढरी यांचे शेत (गट क्रमांक २२२ / अ) आहे. या शेतातून सोमवार, दि. २५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून ते मंगळवार, दि. २६ जुलै रोजी पहाटे ६:१५ वाजेच्या दरम्यान ५५ हजार रुपये किंमतीची बैल जोडीची चोरी करण्यात आले आहे.
यासह बदरखे येथील शेतकरी धृवबाळ शिवाजी यांच्या (शेत गट क्रमांक १९७) शेतातून ५० हजार रुपये किंमतीची बैल जोडीही चोरट्यांनी चोरून नेली आहे. अशा एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या दोन बैल जोड्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शिंदे हे करीत आहे.




