धुळे मनपा प्रशासनाला कंटाळून नगरसेवकाने स्वतः केली खडयांची डागडुजी
झूम मराठी वृत्तसेवा
धुळे (झूम मराठी) महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ बाळापूर प्रभाग ११ च्या कर्तव्यदक्ष नगरसेवक संजय पाटील यांनी स्वतः हातात फावडे घेऊन पाईपलाईन गळतीच्या समस्येसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आहे. “शहराचा विकास आणि हद्दवाढ गावांचा सत्यानाश!” असाच काही महापालिकेचा ध्यास असल्याचा आरोपही बाळापूर येथील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक संजय रामदास पाटील यांनी केला आहे.
एकीकडे पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना बाळापुर गावातील नगरसेवक संजय पाटील यांच्या कुशल नियोजनामुळे बाळापुर ग्रामस्थांना आठवड्यात वेळेवर पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची गळती झाल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अनेक अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे स्वतः उपस्थित राहून या समस्येची पाहणी करून केले व या ठिकाणी गळती शोधण्यासाठी भलेमोठे खड्डे ही तयार केले. मात्र गळतीची समस्या सोडवण्यात आयुक्त देखील अपयशी ठरले. गेल्या दीड महिन्यापासून गळती सापडत नाही, म्हणून भले मोठे खड्डे याठिकाणी खोदकाम केल्याने नागरिकांसाठी हा रस्ता बंद झाला.
अनेक वेळा नगरसेवक संजय पाटील यांनी आयुक्त यांच्याशी भेट घेऊन संपर्क केला, मात्र तरी देखील या समस्येकडे केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र नागरिकांचे पाण्यावाचून हाल न पाहता कर्तव्यदक्ष नगरसेवक संजय पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पहाटेपासूनच झालेल्या पाईपलाईन लिकेजचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करत हातात कुदळ, फावडे घेत खड्डे बुजवून निद्रिस्त कामचुकार मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
अनेक वेळा संजय पाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या भरवशावर न राहता स्वतः गावातील विकासकामे मार्गी लावली आहेत. मनपा प्रशासनाच्या आश्वासनांना बळी न पडता स्व: खर्चाने स्वतः गावाच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचा ध्यास त्यांनी गाठला आहे. सकाळपासून खोदकाम केलेले खड्डे बुजवत पाहताना नागरिकही थक्क झाले होते. अनेकांनी आपल्या नगरसेवकाला हातात कुदळ घेऊन काम करताना पाहून तेही मदतीसाठी पुढे सरसावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाचे काम चव्हाट्यावर आणण्याचे काम नगरसेवक संजय पाटील यांनी केले आहे.



