कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार शिवसेनेने घडवला ! बिंदू चौक, शिवाजी चौकातील पोस्टरची चर्चा
झूम मराठी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या, महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस हेच कोल्हापूरचे ‘उत्तर’ ठरले. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 19 हजार 307 मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती पालकमंत्री सतेज पाटील यांनी. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आघाडीने आपली जागा कायम राखत प्रतिस्पर्धी भाजपला चोख ‘उत्तर’ दिले.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये काल निकाल लागण्यापूर्वीच जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स लागले होते. बावड्यात त्यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकले होते. आता शिवसेनेची सुद्धा विजयानंतर पोस्टर्स झळकली आहेत. कोल्हापूर शहराचा मध्यबिंदू असलेल्या बिंदू चौकात तसेच शिवाजी चौकातील शिवसेनेची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत.
पोस्टर्सवर महाविकास आघाडीच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या शिवसेना नेते, मुंबई व ठाणे नगरसेवक, पदाधिकारी व तमाम शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार असा उल्लेख असला, तरी ‘कोल्हापूरचा पहिला महिला आमदार शिवसेनेने घडवला’ हा ठळक आणि मोठ्या अक्षरातील बॅनर चांगलेच लक्ष वेधून घेतो. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. हा मतदारसंघ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला देताना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची समजूत घातली होती व सक्रीय यंत्रणा राबवण्याचा आदेश दिला होता.


