लक्ष विचलित करण्यासाठी ‘डायरी’चा बोगस गाजावाजा ; वरुण सरदेसाईंचा भाजपवर आरोप!
झूम मराठी
जळगाव : देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. इंधनाचे भाव गगनाला पोहोचले. यासर्व घडामोडीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपतर्फे प्रसार माध्यमांमध्ये चटपटीत बातम्या लावते आणि कुठली तरी ‘डायरी’काढून त्याचा गाजावाजा करते, असा आरोप युवा सेनेचेप्रदेश सचिव वरुण सरदेसाई यांनी केला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात युवा सेनेचा आज ‘निश्चय मेळावा’आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरदेसाई बोलत होते.

भाजपाला चार राज्यात मोठे यश मिळाल्याने महाराष्ट्रातही सत्ता मिळावी असे त्यांना वाटत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारला कसे बदनाम करण्यात येईल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. सर्व प्रयत्न करूनही सत्ता आपल्या हातात येत नाही, असे भाजपला दिसून आले आहे. त्यामुळे अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून आता केंद्रातील यंत्रणेच्या माध्यमातून ते महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट करत आहेत. तसेच महागाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘डायरी’काढून त्यात हे सापडले, ते सापडले असे सांगून उगाच गाजावाजा केला जात असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला. यूपीएच्या काळात इंधन दरवाढ झाल्यानंतर भाजपचे सर्व नेते रस्त्यावर येत होते. मात्र मोदी सरकारच्या काळात भाजपचे नेते रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसा ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला, असे कौतुक करीत आहेत, अशी टीकाही सरदेसाई यांनी केली.
दरम्यान या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील,आमदार किशोर आप्पा पाटील,आमदार चिमणराव पाटील, लताताई सोनवणे, चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे आदी उपस्थित होते.


