जळगावकरांच्या अंगाची लाही लाही
कामासाठी बाहेर पडणार्यांनी डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि पाण्याची बाटली सोबत घ्यावे
झूम मराठी- दिलीप जय परदेशी
जळगाव शहर व जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी हा तापमानाचा पारा 39अंशांवर चढला होता. उन्हाची दाहकता वाढल्याने अबाल वृद्धांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे, तर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने जळगावकरांची अंगाची लाही लाही झाली.
भर उन्हात घराबाहेर पडणार्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. जळगाव शहर व पाचोरा चाळीसगाव, भडगाव या भागात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत चालली आहे. पहाटेच्या सुमारास थंडी आणि दुपारनंतर तीव्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर पडणार्यांनी डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि पाण्याची बाटली सोबत घ्यावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. वारंवार घामाच्या धारा शरीरातून निघत असल्याने शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राखण्यासाठी गरजेनुसार पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. यापुढे एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत तपमानाचा हा पारा सातत्याने वाढतच जाणार आहे.




