विमुक्त-घुमंतू जनजाति विकास परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक अहमदाबाद येथे होणार
कल्याण- विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय) या भटक्या विमुक्तांच्या सर्वात मोठ्या संघटनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक अहमदाबाद, गुजरात येथे २ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद या संघटनेची अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक २ ऑक्टोबर २०२२ रोजी सरदार वल्लभाई पटेल स्मृती सोसायटी हॉल, शाहीबाग, अहमदाबाद, गुजरात येथे संपन्न होणार आहे. संघटनेचे संस्थापक दादा इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीनारायण लोधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत सर्व राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी यांनी उपस्थित रहावयाचे आहे. संघटनेचा विस्तार, भटक्या-विमुक्तांच्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समस्या, विविध राज्यात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असून राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांची उपस्थिती राहणार आहे. सदर बैठकीस उपस्थितीचे आवाहन गुजरात राज्याध्यक्ष भरतभाई पटनी व राज्य कार्यवाह निमेश इंदेकर यांनी केले असल्याची माहिती भटके-विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते राहुल परदेशी यांनी दिली आहे.



